एकोणीस वर्षांचा होता तेव्हा त्याच्या मोटारसायकलचा अपघात झाला. त्या अपघातात त्याने उजवा पाय गमावला. अपंग झाला. एवढा तरुण मुलगा असा अपंग झाला म्हटल्यावर त्याच्या चिंतेने सगळेच हळहळले.
ही गोष्ट आहे जॉन मॅकफॉलची. ४३ वर्षांचा जॉन ब्रिटिश नागरिक आहे. तो एक पॅरालिम्पिक धावपटू आहे आणि सर्जनसुद्धा ! पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सीकडून इंटरनॅशनल स्पेस सेंटरमधील एका अंतराळ मोहिमेसाठी पाठवण्यात येणार असलेला पहिला अपंग अंतराळवीर म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या वैद्यकीय चाचण्या तो पास झाला आहे. युरोपियन स्पेस एजन्सीचे ह्यूमन ॲण्ड रोबोटिक एक्सप्लोरेशन डायरेक्टर डॅनियल न्यूएनश्वांडर यांनी याबाबत माहिती दिली. २०२२ मध्ये युरोपियन स्पेस एजन्सीने ‘फ्लाय’ या कार्यक्रमातून एखाद्या अपंग अंतराळवीराचं अंतराळात राहणं कितपत शक्य आहे, याचा अभ्यास केला. मॅकफॉलला त्याच्या अपंग असण्यामुळे अंतराळात वावरण्यास कोणतेही अडथळे येणार नाहीत, हे स्पष्ट झाल्यानंतर एजन्सीकडून त्याच्या निवडीची घोषणा करण्यात आली.
ही संधी मिळवणं मॅकफॉलसाठी सोपं नव्हतं. सूक्ष्म गुरूत्वीय परिस्थितीत तग धरून राहण्यापासून ते इंटरनॅशनल स्पेस सेंटरमधील दैनंदिन काम कसं करणार आणि एखादी आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास काय करणार, या सगळ्याची अवघड प्रात्यक्षिकं यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतरच त्याला ही संधी मिळाली. मॅकफॉलने ज्या सहजपणे अनेक गोष्टी आत्मसात केल्या ते पाहणं आपल्यासाठी ‘सरप्रायजिंग’ असल्याचं डॅनियल न्यूएनश्वांडर यांनी म्हटलं आहे.
असं असलं तरी अंतराळ मोहिमेवर जाण्यासाठी मॅकफॉलला आणखी काही अग्निपरीक्षा द्याव्या लागतील. इंटरनॅशनल स्पेस सेंटरमध्ये काम करत असताना किंवा तिथे जाण्यासाठी सुरक्षेबाबतचे नियम अत्यंत कठोर असतात, याकडे न्यूएनश्वांडर लक्ष वेधतात. मॅकफॉलला त्याच्या कृत्रिम पायासह अंतराळ मोहिमेवर जाण्यास स्वतःला पात्र ठरवण्यासाठी अनेक कठीण परीक्षा द्याव्या लागणार आहेत. अंतराळ मोहिमेवर जाताना अंतराळवीर स्वतःसोबत बरोबर नेतात ती प्रत्येक गोष्ट अत्यंत कठोर सुरक्षा तपासण्यांमधून जाते. त्यासाठी इंटरनॅशनल स्पेस सेंटरचे ‘सेफ्टी अँड ऑपरेशनल स्टँडर्डस्’ आहेत. ते सगळेच्या सगळे स्टँडर्डस् मॅकफॉलच्या कृत्रिम पायालाही लावले जाणार आहेत. मॅकफॉलसाठी अंतराळात वापरण्यायोग्य विशेष प्रकारचा पाय तयार करण्यासाठी एजन्सी ‘ऑटोबॉक’ नावाच्या जर्मन कंपनीबरोबर प्रयत्नशील आहे. आपल्याला मिळालेली संधी ही आपली एकट्याची नसून जगभरात कृत्रिम अवयव वापरणाऱ्या प्रत्येकाची आहे. आपण अंतराळात काय करणार त्याचा लाभ पृथ्वीवरील प्रत्येकाला व्हायला हवा, असंही मॅकफॉल म्हणतो. युरोपियन स्पेस एजन्सीने अंतराळ मोहिमेसाठी मॅकफॉलची निवड करणं हे अनेक अर्थांनी महत्त्वाचं आहे. दुर्मिळ संधी ही फक्त रुढार्थाने निरोगी व्यक्तींची मक्तेदारी नाही, हा संदेश त्यातून मिळतो. लवकरच आपल्या सगळ्यांना एक अपंग अंतराळवीर अंतराळात दिसणार, हे निश्चित.