ब्रुसेल्स : अमेरिकेने लावलेल्या समतुल्य आयात कराला (रिसिप्रोकल टॅरिफ) उत्तर म्हणून लावावयाच्या कराचा निर्णय युरोपीय संघाने ९० दिवसांसाठी स्थगित केला.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळून इतर सर्व देशांविरोधी आयात कराला स्थगिती दिल्यामुळे ‘ईयू’ने हा निर्णय घेतला आहे. युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला व्हॉन डेर लेयेन यांनी गुरुवारी या निर्णयाची घोषणा केली. ट्रम्प यांनी युरोपीय संघाच्या वस्तूंवर २०% आयात शुल्क लावण्याची घोषणा केली होती. यास त्यांनी बुधवारी ९० दिवसांची स्थगिती दिली.
९० दिवसांनंतर काय? तयारीत राहण्याचा सल्ला९० दिवसांनंतर ट्रम्प यांच्याकडून आयात शुल्क लावले जाऊ शकते, त्यामुळे या कालावधीत कंपन्यांनी पर्यायी आपत्कालीन योजना तयार ठेवायला हवी, असे ईवाय इंडियाचे कर भागीदार बिपिन सपरा यांनी सांगितले. त्यासाठी कंपन्यांनी पुरवठा साखळी आणि किंमत निर्धारण रणनीतींचे फेरमूल्यांकन करावे, असे सपरा म्हणाले.
चीनची इतर देशांना सादअमेरिकेसोबतच्या व्यापार युद्धातून मार्ग काढण्यासाठी चीनने इतर देशांशी संपर्क सुरू केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले की, न्याय्य मुद्द्यावर आम्हाला जगभरातून समर्थन मिळत आहे. अमेरिकेला मात्र समर्थन मिळू शकणार नाही. चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी युराेपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला व्हॉन डेर लेयेन यांच्याशी फोनवर बातचीत केली. चीनचे वाणिज्य मंत्री वँग वेन्ताओ यांनी आसियान देशांशीही संपर्क केला.
‘मूडीज’ने घटवला वृद्धीदर अंदाजवित्तीय सेवा कंपनी मूडीज ॲनालिटिक्सने वर्ष २०२५ साठी भारताच्या सकळ राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) वृद्धीदर अंदाज घटवून ६.१ टक्के केला आहे. अमेरिकेच्या आयात शुल्काचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन मूडीजने ही घट केली आहे. मार्चमध्ये मूडीजने ६.४ टक्के वृद्धीदर अनुमानित केला होता.