ऑनलाइन टीम
हेरात (अफगाणिस्तान), दि. २३ - अफगाणिस्तानमधील हेरात येथील भारतीय दुतावासावर शुक्रवारी पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात आत्तापर्यंत तीन दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा जवानांना यश आले असून आणखी एका दहशतवाद्याशी अजूनही चकमक सुरु आहे.
हेरात येथील भारतीय दुतावासावर शुक्रवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास चार बंदूकधारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. गोळीबार व ग्रेनेडने हल्ला करत दुतावासाच्या आत शिरण्याचा दहशतवाद्यांचा बेत होता. मात्र दुतावासाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या भारत तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांनी अफगाणिस्तानच्या सैन्याच्या मदतीने दहशतवाद्यांचा प्रयत्न उधळून लावला. या जवानांनी चोख प्रत्यूत्तर देत दहशतवाद्यांना रोखले. आत्तापर्यंत जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असून आणखी एका दहशतवाद्याशी चकमक सुरु आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर दुतावासातील सर्व भारतीय अधिकारी व कर्मचारी सुरक्षित असल्याचे भारताच्या विदेश मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे अफगाणिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला येणार असून याचा निषेध करण्यासाठी तालिबानने हा हल्ला केल्याचे समजते.