अमेरिका आणि चीन यांच्यातील टॅरिफ वॉर आता एका वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचले आहे. याच्या विळख्यात आता विमान वाहतूक क्षेत्रही आले आहे. चीनने आपल्या विमान कंपन्यांना अमेरिकन कंपनी बोइंगकडून जेटची डिलिव्हरी न घेण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नाही तर, अमेरिकेकडून विमान उपकरणे आणि सुट्या भागची खरेदीही थांबवावी, असे निर्देश चीन सरकारने आपल्या विमान कंपन्यांना दिले आहेत.
आता अमेरिका चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर १४५ टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावत आहे, तर चीन अमेरिकन वस्तू्ंवर १२५ टक्के टॅरिफ लावत आहे. दरम्यान, ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, चीन सरकार बोईंग जेट लीजवर घेणाऱ्या आणि त्यासाठी अधिक पैसे मोजणाऱ्या विमान कंपन्यांना मदत करण्याचा विचार करत आहे. यासंदर्भात, बोईंग आणि संबंधित चिनी विमान कंपन्यांकडून अद्याप कसल्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
एव्हिएशन फ्लाइट्स ग्रुपच्या आकडेवारीनुसार, सुमारे १० बोईंग ७३७ मॅक्स विमाने चिनी एअरलाइन्सच्या ताफ्यात सामील होण्यासाठी सज्ज आहेत. यात चायना सदर्न एअरलाइन्स कंपनी, एअर चायना लिमिटेड आणि झियामेन एअरलाइन्स कंपनीच्या प्रत्येकी दोन विमानांचा समावेश आहे. प्रोडक्शन ट्रॅकिंग फर्मच्या वेबसाइटनुसार, काही जेट्स सिएटलमधील बोईंगच्या फॅक्टरी बेसजवळ उभे आहेत. तर काही पूर्व चीनमधील झौशानमधील फिनिशिंग सेंटरमध्ये आहेत. ज्या विमानांची कागदपत्रे पूर्ण झाली आहेत, त्यांना प्रकरणानुसार मंजुरी मिळू शकते.
महत्वाचे म्हणजे चीन हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विमान वाहतूक बाजार आहे. पुढील २० वर्षांत जागतिक विमान मागणीत चीनचा वाटा २० टक्के असेल, अशी अपेक्षा आहे.