बीजिंग : राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्यामुळे उभय देशांच्या मनातील काही शंका दूर झाल्या आणि द्विपक्षीय संबंध नव्या टप्प्यात पोहोचले. चर्चेदरम्यान सीमावाद मैत्रिपूर्ण सहकार्यासह मुत्सद्दी पातळीवर सोडविण्याबाबत उभय देशांत महत्त्वपूर्ण सहमती झाली. चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनिंग यांनी पत्रकारांना सांगितले की, राष्ट्राध्यक्ष शी यांच्या भारत दौऱ्यामुळे दोन्ही पक्षांतील काही शंका दूर होऊन द्विपक्षीय संबंधात नवे पर्व सुरू झाले आहे. लडाखच्या चुमार भागात उभय देशांच्या सैनिकात निर्माण झालेला तणाव आणि त्याचा शी यांच्या अलीकडेच संपन्न झालेल्या भारत दौऱ्यावर झालेला नकारात्मक परिणाम याविषयी चुनिंग यांना छेडण्यात आले होते. त्या म्हणाल्या की, सीमावादाचा जिथपर्यंत संबंध आहे, मी स्पष्ट करू इच्छिते की, ही शंका अनावश्यक आहे. कारण, उभय नेत्यांत परस्पर सहकार्याने मुत्सद्दी पातळीवर सीमावाद सोडविण्याबाबत सहमती झाली आहे. आमच्याकडे सीमावादावर प्रभावी प्रणाली आहे. प्रभावी बातचीतद्वारे आम्ही काही वाद सोडवू शकतो. (वृत्तसंस्था)
उभय देशातील काही शंका दूर- चीन
By admin | Updated: September 23, 2014 06:27 IST