रियाध : सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला बिन अब्दुल अजीज यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. सौदी अरेबियाचे नवे राजे म्हणून अब्दुल्लांचे सावत्र भाऊ युवराज सलमान बिन अब्दुल अजीज अल सउद यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. राजे अब्दुल्ला यांनी रात्री एक वाजता अंतिम श्वास घेतला. प्रशासनाने अब्दुल्लांच्या निधनामागील कारण स्पष्ट केले नाही. मात्र, न्यूमोनियामुळे डिसेंबरमध्ये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व नळीच्या साहाय्याने त्यांचा श्वासोच्छवास सुरू होता, असे सांगण्यात येते. अब्दुल्लांच्या निधनानंतर त्यांचे सावत्र भाऊ सलमान यांच्याकडे राजेपद सोपविण्यात आले आहे. सलमान सध्या संरक्षणमंत्री आहेत. याशिवाय राजधानी रियाधच्या गव्हर्नरपदाचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. अब्दुल्ला यांच्या सावत्रभावांपैकी एक मुकरेन यांचे नाव नवे युवराज म्हणून घोषित करण्यात आले. दुपारच्या नमाजनंतर अब्दुल्ला यांचा दफनविधी करण्यात आला. त्यानंतर नवे राजे व नव्या युवराजांप्रती निष्ठा बाळगण्याचा संकल्प सोहळा घेण्यात आला. या सोहळ्याला नागरिकांना आमंत्रित करण्यात आले होते. अब्दुल्ला यांनी २००५ मध्ये राजसूत्रे स्वीकारली होती. त्यांच्या कार्यकाळात सौदी अरेबिया अमेरिकेचा अरब देशांतील महत्त्वपूर्ण सहकारी ठरला. पेट्रोलियम पदार्थांची निर्यात करणाऱ्या देशांची सर्वोच्च संघटना ओपेकने तेलाचे उत्पादन घटविण्यास नकार देण्यात सौदी अरेबियाची प्रमुख भूमिका होती. जूनपासून कच्च्या तेलाच्या किमती निम्म्यावर आलेल्या आहेत. अब्दुल्लांच्या निधनानंतर कच्च्या तेलाविषयीचे दोन महत्त्वपूर्ण जागतिक करार संपुष्टात आले. सौदीचे नवे राजे हे करार कायम ठेवतील किंवा नाही याबाबत अनिश्चितता आहे. (वृत्तसंस्था)बराक ओबामा- राजे अब्दुल्ला ‘मनमोकळे नेते’ होते. अरब शांततेसाठी त्यांनी अनेक धाडसी पावले उचलली.डेव्हिड कॅमेरुन- अब्दुल्ला हे शांततेप्रतीच्या बांधिलकीसाठी कायम स्मरणात राहतील.बान की मून- राजे अब्दुल्ला यांनी शांततेचा मोठा वारसा मागे ठेवला आहे.अब्दुल्ला यांचे उत्तराधिकारी राजे सलमान यांनी आपल्या पूर्वपदस्थांची धोरणे कायम ठेवण्याचे आश्वासन आज दिले.
सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला यांचे निधन
By admin | Updated: January 24, 2015 03:51 IST