ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. ८ - फ्रान्समधील चार्ली हेब्दो या मासिकाच्या कार्यालयावर हल्ला करणा-यांपैकी एका हल्लेखोर पोलिसांना शरण आल्याचे वृत्त आहे. १८ वर्षीय हैमद मोरादने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असले तरी सय्यद क्वाची व शेरीफ क्वाची हे इतर दोन हल्लेखोर अद्याप फरार आहेत. फ्रान्स पोलिसांनी त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या हल्ल्यानंतर संपूर्ण फ्रान्समध्ये कडकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
पॅरिसच्या व्यंगात्मक व तिरकस लेखनासाठी प्रसिद्ध असणा-या डाव्या विचारांच्या साप्ताहिकाच्या कार्यालयावर सशस्त्र हल्लेखोरांनी बुधवारी सकाळी ११.३० वाजता हल्ला केला. या हल्ल्यात संपादक, चार व्यंगचित्रकारांसह १२ जण ठार झाले असून सात जण जखमी झाले आहेत. या मासिकामध्ये २०११ मध्ये पैगंबर यांचे वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित केल्याने वाद निर्माण झाला होता. फ्रान्समध्ये गेल्या ४० वर्षात झालेला हा सर्वाधिक भीषण हल्ला आहे.
उपहासात्मक मासिक असलेल्या चार्ली हेब्दोचे मुख्यालय पॅरिसमध्ये आहे. बुधवारी दुपारी अज्ञात बंदुकधा-यांनी कार्यालयावर हल्ला करत अंधाधूंद गोळीबार केला. त्यात १२ जणांना प्राण गमवावे लागले तर ७ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये १० पत्रकार आणि २ पोलिसांचा समावेश आहे. हल्ल्याचे वृत्त समजताच पॅरिस पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला. हल्ला केल्यावर दहशतवाद्यांनी 'पैगंबराच्या विरोधात जाणा-यांचा बदला घेतला' अशी घोषणा देत हल्लेखोर पळून गेले होते.या हल्ल्यानंतर २० देशांत फ्रान्सची दूतावास व सांस्कृतिक केंद्रे बंद करण्यात आली आहेत.