ऑनलाइन लोकमत
पॅरीस, दि. ७ - फ्रान्समधील चार्ली हेब्दो या मासिकाच्या कार्यालयावर इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. चार्ली हेब्दो या मासिकामध्ये २०११ मध्ये पैगंबर यांचे वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित केल्याने वाद निर्माण झाला होता. याचा बदला घेण्यासाठीच हा हल्ला झाला असावा असे समजते. या घटनेचे चित्रीकरण बाजुच्या इमारतीतल्या काहीजणांनी केले तर काहीजणांनी दहशतवाद्यांना बंदुका घेऊन इमारतीत जाताना बघितले. त्यांच्या सांगण्यानुसार पैगबरांच्या वादग्रस्त कार्टूनचा बदला घेण्यात आल्याचे तसेच आम्ही अल कायदाचे असल्याचे म्हटल्याचे वृत्त आहे.
चार्ली हेब्दो हे उपहासात्मक मासिक असून या मासिकाचे मुख्यालय पॅरिसमध्ये आहे. बुधवारी दुपारी अज्ञात बंदुकधा-यांनी कार्यालयावर हल्ला करत अंधाधूंद गोळीबार केला. यामध्ये सुमारे १२ जण ठार झाले आहेत. तर १० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये १० पत्रकार आणि २ पोलिसांचा समावेश आहे. हल्ल्याचे वृत्त समजताच पॅरिस पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. पोलिसांनी कार्यालयातील सुमारे ४० जणांची सुखरुप सुटका केली आहे. या हल्ल्यातील मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. हल्लेखोरांकडे एके ४७ आणि रॉकेट लॉंचर असल्याचे समजते. २ ते ३ दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे समोर येत असून स्थानिकांची कार चोरुन त्यांनी पॅरीसहून बाहेर जाणा-या मार्गाच्या दिशेने पलायन केले. हल्ला केल्यावर दहशतवाद्यांनी 'पैगंबराच्या विरोधात जाणा-यांचा बदला घेतला' अशी घोषणा दिल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. दरम्यान, हल्ल्याचे वृत्त समजताच फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलवली आहे.
प्रसारमाध्यमांना व महत्त्वाच्या राजकीय कार्यालयांना जास्त सुरक्षा पुरवण्यात देण्यात येत असून देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त होत आहे.