इस्लामाबाद : पाकिस्तानात शनिवारी रात्री राष्ट्रीय पातळीवरील यंत्रणेत बिघाड झाल्याने देशातील अनेक भागांत काळोख राहिला. बिघाडाचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र, यामुळे पाकिस्तानातील ८० टक्के भागात अंधार होता. रविवारी दिवसभर सरकारी यंत्रणा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील होती.दूरचित्रवाणी वाहिन्यांनी बलुचिस्तान प्रांतात दहशतवाद्यांनी ट्रान्समिशन लाईन उडविल्याचे वृत्त दिले आहे. मात्र, पाणी व ऊर्जा उपमंत्री आबिद शेर अली यांनी हे वृत्त फेटाळून लावत कोणताही दहशतवादी हल्ला झाला नसल्याचा दावा केला. तासभर ट्रान्समिशन लाईनमध्ये बिघाड झाल्याने हे संकट उद्भवल्याचे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)