वॉशिंग्टन : धर्म आणि वंश या मुद्यावरून कोणालाही लक्ष्य करणाऱ्या राजकारणाला स्वीकारू नका, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी बुधवारी केले. दहशतवादाच्या नव्या कारवायांसाठी पाकिस्तान, अफगाणिस्तान व मध्यपूर्व सुरक्षित आश्रयस्थान बनू शकतात, असा इशारा त्यांनी दिला.वंश किंवा धर्म समोर ठेवून लोकांना लक्ष्य करणाऱ्या कोणत्याही राजकारणाला धुडकावून लावणे ही गरज असल्याचे ओबामा म्हणाले. अध्यक्षीय कारकीर्दीतील शेवटच्या भाषणात (स्टेट आॅफ द युनियन अॅड्रेस) ते बोलत होते. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षातर्फे इच्छुक डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचार मोहिमेमध्ये मुस्लिमांवर जोरदार टीका केली होती. अमेरिकेत सर्व मुस्लिमांना तात्पुरती बंदी घालण्याचे ट्रम्प यांनी सुचविले होते. त्याची ओबामांच्या वक्तव्याला पार्श्वभूमी होती. अनेक अमेरिकन नागरिकांना राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेची भीती वाटते व ते त्यापासून स्वत:ला दूर ठेवतात. ही व्यवस्था आपल्या हिताविरुद्ध असल्याचे त्यांचे मत असल्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जे रिपब्लिकन्स या असुरक्षिततेशी खेळत आहेत त्यांना ओबामांनी फटकारले. (वृत्तसंस्था)
पाक दहशतवादाचे आश्रयस्थान बनेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2016 01:57 IST