बगदाद : इसिस वा इस्लामिक स्टेटच्या एका जिहादीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा व्हाईट हाऊसमध्ये शिरच्छेद करण्याची धमकी दिली असून, अमेरिकेला इस्लामी स्टेटमध्ये रूपांतरित करू असे म्हटले आहे. एका कुर्द सैनिकाच्या शिरच्छेदाची चित्रफीत जारी करण्यात आली असून, या सैनिकाला मारण्याआधी ही धमकी देण्यात आली आहे. मोसूल शहरातील शांतताप्रिय मुस्लिम नागरिकांवर बॉम्बहल्ले या नावाखाली ही चित्रफीत जारी करण्यात आली आहे. या जिहादीने चेहरा झाकला असून, त्याने अमेरिका, फ्रान्स, बेल्जियम व कुर्दवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. इसिसचे समर्थक अमेरिका व कुर्द अध्यक्षांचा शिरच्छेद करतील व युरोपियन देशात कारबॉम्बचे स्फोट घडवून आणतील, असे या जिहादीने धमकी देताना म्हटले आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली इस्लामिक स्टेटविरोधात लढणाऱ्या देशांना ही धमकी आहे. मोसूल शहरातील शांतताप्रिय नागरिकांवर अमेरिकेने बॉम्बफेक केली असून विषारी वायू सोडून अनेकांचा बळी घेतला आहे. त्यामुळे पेशमर्गा दलाला हा हल्ला करणे भाग पडत आहे, असे या चित्रफितीत म्हटले आहे. या चित्रफितीत कोसळलेल्या इमारती, मृतदेह व जखमी मुले यांची छायाचित्रेही दाखविण्यात आली आहेत. त्यानंतर इसिसचा संपूर्ण जगासाठी संदेशही प्रसिद्ध केला असून तो कुर्द भाषेत आहे. मेमरी जिहाद व टेररिझम थ्रेट मॉनिटर यांनी तो भाषांतरित केला आहे. मध्यपूर्वेतील संशोधन संस्था (मेमरी) यांनी केलेल्या दाव्यानुसार ओबामा यांना दिलेल्या धमकीची चित्रफीत सोमवारी प्रसिद्ध झाली आहे. याआधी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीने मोसूल शहरावर बॉम्बहल्ला केला होता. (वृत्तसंस्था)
व्हाईट हाऊसमध्येच ओबामा यांचा शिरच्छेद करण्याची इसिसची धमकी
By admin | Updated: January 30, 2015 00:21 IST