ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. २९ - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा व्हाइट हाऊसमध्ये घुसून शिरच्छेद करु अशी धमकी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया (ISIS) या दहशतवादी संघटनेने दिली आहे. ओबामांच्या शिरच्छेदानंतर अमेरिकेला मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत करु असे इसिसने म्हटले आहे.
इसिसने एका कुर्दिश जवानाचा शिरच्छेद करतानाच व्हिडीओ प्रकाशित केला आहे. या व्हिडीओत शिरच्छेद करणारा इसिसचा दहशतवादी ओबामा यांचेही शिरच्छेद करु अशी धमकी देताना दिसत आहे. या नवीन व्हिडीओत थेट ओबामांनाच धमकी दिल्याने जगभरात खळबळ माजली आह. या व्हिडीओत इसिसचे तीन दहशतवादी तोंडाला कापड गुंडाळून उभे आहेत. त्यांच्यासमोर एक कुर्दीश जवान गुडघ्यावर बसला आहे. ओबामा, आम्ही एक दिवस अमेरिकेपर्यंत पोहोचू आणि व्हाइट हाऊसमध्ये घुसून तुमचा शिरच्छेद करु अशी धमकी त्या दहशतवाद्याने दिली. फ्रान्स आणि त्याचे मित्र राष्ट्र बेल्जियममध्ये आम्ही शस्त्रास्त्रांसह दाखल होऊ असेही त्याने म्हटले आहे. धमकी दिल्यावर इसिसचा दहशतवादी या जवानाचाही शिरच्छेद करतो.