ऑनलाइन लोकमत
इस्तांबुल, दि. १७ - 'ख्रिस्तोफर कोलंबसने नव्हे तर मुसलमानांनी अमेरिकेचा शोध लावला होता' तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांच्या या अजब दाव्यामुळे खळबळ माजली आहे. 'कोलंबसच्या ३०० वर्षांआधीच मुस्लिम दर्यावर्दी अमेरिकेत पोहोचले होते', असेही त्यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
इस्तांबुल शिखर संमेलनादरम्यान लॅटिन अमेरिकेतील मुस्लिम नेत्यांसमोर एर्दोगन बोलत होते. अमेरिकेचा शोध लावल्याचे श्रेय त्यांनी मुसलमानांना दिले आहे. ख्रिस्तोफर कोलंबसने १४९२मध्ये अमेरिका खंडाचा शोध लावल्याचे इतिहासात म्हटले आहे. मात्र मुस्लिम दर्यावर्दींनी कोलंबसच्या ३०० वर्षांआधी ११७८मध्येच अमेरिकेचा शोध लावला होता, असे एर्दोगन यांच्या म्हटले आहे. क्युबाच्या किनारी भागातील एका टेकडीवर मशीद पाहिल्याचे कोलंबसने त्यांच्या नोंदींमध्ये नमूद केले आहे. त्याचा उल्लेखाच्या आधारावर एर्दोगन यांनी हे विधान केले आहे.