क्वालालंपूर : एमएच ३७० या मार्च महिन्यात बेपत्ता झालेल्या विमानाला अपघातच झाला असे आता मलेशियन सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे या विमानात मृत्युमुखी पडलेल्या ५ भारतीयांसह २३९ प्रवाशांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विमान बेपत्ता झाले, त्यानंतर जवळपास ११ महिन्याने ही घोषणा करण्यात आली आहे. मलेशियाचे नागरी उड्डयन प्रमुख अझरुद्दीन अब्दुल रेहमान यांच्या आधीच रेकॉर्ड करण्यात आलेल्या निवेदनानुसार एमएच ३७० या मलेशियन एअरलाईन्सच्या विमानाला अपघातच झाला, असे दु:खित अंत:करणाने जाहीर करत आहोत. विमान बेपत्ता झाल्यानंतर ३२७ दिवसांनी हाती आलेल्या सर्व माहितीवरून हे विमान कोसळलेल्या परिसरात अस्तित्वात असणे कठीण आहे. या विमानातील २३९ प्रवासी व कर्मचारी मृत झाले असे आता समजले जाईल. मलेशियन टीव्हीवर हा संदेश प्रसारित करण्यात आला आहे. असे असले तरीही या विमानाच्या अवशेषांचा शोध घेतला जाईल.विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांना ही घोषणा स्वीकारणे अवघड जाणार आहे. (वृत्तसंस्था)