ऑनलाइन लोकमत
बिजींग, दि. 14 - चीनच्या लष्करी सरावादरम्यान दक्षिण जपानच्या दोन बेटांजवळून चीनच्या सहा लढाऊ विमानांनी उड्डाण केले. चीनच्या या विमानांनी जपानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले नाही पण जपानच्या सीमेजवळून अशा प्रकारचे उड्डाण अनपेक्षित होते असे जपानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. चीनची एच-6 बॉम्बर विमाने या कवायतीमध्ये सहभागी झाली होती.
मागच्या काही महिन्यांपासून पश्चिम पॅसिफिक महासागरात चिनी नौदल आणि हवाई दलाचा अशा प्रकारचा सराव सुरु आहे. चिनी हवाई दलाच्या विमानांनी कुठल्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही. मोहिमेच्या गरजेनुसार अशा प्रकारचा सराव करत राहू असे चिनी संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. जपानने उगाचच अकांडतांडव करु नये, एकदा सवय झाली की, सर्व काही सुरळीत होईल असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
आणखी वाचा
चीनच्या शेजारच्या अनेक देशांबरोबर सीमा वाद आहे. सध्या सिक्कीममध्ये भारत आणि चीनचे सैन्य समोरासमोर उभे ठाकले आहे. जपान बरोबरही चीनचा सीमावाद आहे. सध्या बंगालच्या उपसागरात चीनच्या नाकावर टिच्चून भारत, अमेरिका आणि जपान यांच्या नौदलांमध्ये मलबार सराव सुरु आहे. तिन्ही देशांमधील सैनिकी संबंधांना दृढ करणे हा या सरावाचा उद्देश आहे. या सरावाचे हे २१ वे पर्व असून, हा संयुक्त नाविक सराव १७ जुलैपर्यंत चालणार आहे.
"समान आव्हाने आणि संकटांचा सामना करणे हे या सरावाचे उद्दीष्ट आहे." मात्र भारतीय समुद्रामध्ये चीनी पाणबुड्यांच्या हालचालींबाबत कोणतीही प्रतिक्रिया देणे त्यांनी टाळले. दरम्यान भारत, अमेरिका आणि जपान यांच्यातील नाविक सरावाबाबत चीनची भूमिका काय असेल या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेच्या स्ट्राइक ग्रुप ११ चे कमांडर रियर अॅडमिरल विल्यम डी. ब्रायन म्हणाले, "या सरावातून एकच संदेश जातो तो म्हणजे आम्ही सोबत राहून चांगले काम करू शकतो. तसेच संभाव्य संकटांना पूर्णपणे संपुष्टात आणू शकतो."उद्दामपणा करणा-या चिनी ड्रॅगनला रोखण्यासाठी आता भारत, अमेरिका आणि जपान एकत्र आले आहेत.