ढाका : बांगलादेशच्या विरोधी पक्षनेत्या व बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) अध्यक्षा बेगम खालेदा झिया यांची गृहकैदेतून सोमवारी अनपेक्षितरीत्या सुटका झाली. गेल्या वर्षी झालेली निवडणूक वादग्रस्त ठरली असून त्यावरून सुरू झालेला हिंसाचार थांबायला तयार नाही. त्यात आतापर्यंत २८ जण ठार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर खालेदा झिया यांची सुटका झाली.खालेदा झिया यांच्या जिल्हा कार्यालयाबाहेरचे अडथळे आणि अतिरिक्त पोलीस कर्मचारी दुपारी तीन वाजता हटविण्यात आले. बीएनपीचे संस्थापक व खालेदा झिया (६९) यांचे पती झिया-उर-रहमान यांच्या ७९ व्या जयंतीचे निमित्त साधून ही सुटका झाली. झिया-उर-रहमान यांच्या कबरीला भेट देण्यापासून खालेदा झिया यांना अडवले जाणार नाही व त्यांना कुठेही फिरण्यास मोकळीक असेल, असे गृहराज्यमंत्री असदुझमन खान कमाल यांनी रविवारी रात्री सांगितले. खालेदा झिया यांना या महिन्यात ३ तारखेला त्यांच्याच कार्यालयात अडकवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे देशभर असंतोष निर्माण होऊन हिंसाचारात २८ जण ठार झाले. पंतप्रधान शेख हसीना यांनी ही वादग्रस्त निवडणूक जिंकल्यानंतर खालेदा झिया यांनी २० पक्षांचा समावेश असलेला मेळावा ५ जानेवारी आयोजित केला होता. शेख हसीना यांनी नव्याने निवडणूक घ्यावी अशी झिया यांची मागणी आहे. गेल्या वर्षीच्या निवडणुकीवर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला होता. (वृत्तसंस्था)
खालिदा झियांची गृहकैदेतून सुटका
By admin | Updated: January 20, 2015 01:34 IST