ऑनलाइन लोकमत
बेरुत्त, दि. १६ - इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीयाने (ISIS) क्रूर कृत्याचा सिलसिला सुरुच ठेवला असून रविवारी आयएसआयएसने आणखी एका अमेरिकन नागरिकाचा शिरच्छेद करतानाचा व्हिडीओ जाहीर केला आहे. पीटर कॅसिग असे या नागरिकाचे नाव असून ते इराक आणि सिरीयातील युद्धग्रस्तांसाठी मदत करत होते.
आयएसआयएसने महिनाभरापूर्वी अॅलन हेलिंग या ब्रिटीश नागरिकाची हत्या करताना कॅसिग यांचादेखील शिरच्छेद करु अशी धमकी दिली होती. रविवारी आयएसआयएसने कॅसिग यांचा शिरच्छेद करतानाचा व्हिडीओ जाहीर केला. या व्हिडीओत सिरीयातील १८ अधिका-यांचाही शिरच्छेद करताना दाखवण्यात आले असून हे सर्व जण सिरीयाच्या सैन्यातील अधिकारी होते. कॅसिगचा शिरच्छेद करणारा दहशतवाद्याने अमेरिकेला इशारा दिला. कॅसिग हे अमेरिकन सैन्यातील माजी जवान असून सध्या ते इराक व सिरीयातील युद्धग्रस्तांना मदत करत होते. वर्षभरापूर्वी त्यांचे सिरीयातून अपहरण झाले होते. आयएसआयएसच्या या सामूहिक हत्याकांडाचे जगभरातून निषेध होत आहे.