टोकियो : वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी १ जुलैपासून सुरू होईल. जीएसटीमुळे महागाईत कोणत्याही प्रकारे लक्षणीय वाढ होणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले.स्वातंत्र्यानंतरच्या काळातील सर्वांत मोठ्या कर सुधारणा म्हणून जीएसटीकडे पाहिले जात आहे. जीएसटीचा अंमल सुरू झाल्यानंतर संपूर्ण देशात एकच एक कर लागू होईल. सीआयआय-कोटक गुंतवणूकदार गोलमेज परिषदेत भाषण करताना जेटली म्हणाले की, माझ्या नेतृत्वाखालील तसेच सर्व राज्यांचे प्रतिनिधी असलेली जीएसटी परिषद लवकरच जीएसटीच्या करांचे दर निश्चित करील. १ जुलैपासून ही व्यवस्था आमलात आणण्याच्या दिशेने देश प्रगती करीत आहे. सध्याची भारतातील अप्रत्यक्ष करांची रचना अत्यंत क्लिष्ट आहे. व्यावसायिकांना अनेक अधिकाऱ्यांशी व्यवहार करावा लागतो. देश अनेक बाजारांत विभागला गेला आहे. त्यामुळे मालाची मुक्त वाहतूक शक्य होत नाही. जीएसटीमध्ये या सर्व अडचणी हद्दपार होतील. जेटली म्हणाले की, जीएसटी अंतर्गत वस्तूंवरील कर काही प्रमाणात कमी होईल. सेवांवरील कर मात्र काही प्रमाणात वाढेल. जीएसटी परिषदेची पुढील बैठक १८-१९ मे रोजी होत आहे. या बैठकीत अंतिम कर निर्धारित करण्यात येतील. त्यामुळे १ जुलैपासून जीएसटी लागू करण्यात काही अडचण येणार नाही. (वृत्तसंस्था)
जीएसटीने महागाई वाढणार नाही
By admin | Updated: May 9, 2017 00:09 IST