लिमा : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतासह विकसनशील देशांचाही सहभाग असावा यासाठी जागतिक बँकेच्या गटात विकसनशील देशांची भागीदारी वाढली पाहिजे, अशी जोरदार मागणी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. ते येथे डेव्हलपमेंट कमिटीच्या खुल्या सत्रात बोलत होते.विकसनशील देशांच्या वाढत्या आर्थिक मागण्यांची पूर्तता करण्यासाठी भांडवलामध्ये भरीव वाढ केली जावी, असे जेटली म्हणाले. वाढलेल्या कर्जाच्या मागणीला तोंड देणे २०१८ नंतर शक्य होणार नाही, असे जेटली यांनी बँकेच्याच अहवालाचा उल्लेख करून विकास कामांसाठी सातत्याने पैशांची मागणी होणार असल्याचे सांगितले.जागतिक बँकेचीच शाखा असलेल्या आयएफसी आधीच निधीच्या टंचाईला तोंड देत आहे, असे सांगून अरुण जेटली म्हणाले की मोठ्या प्रमाणावर अर्थपुरवठा झाला पाहिजे व शाश्वत विकासाचे लक्ष्य गाठण्यासाठी जागतिक बँक गटाने केलेल्या योजनेची अंमलबजावणी झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.विकासाच्या प्रश्नांवर देशांदेशांमध्ये सहमती घडवून आणण्याचे काम डेव्हलपमेंट कमिटी करते. ही कमिटी जागतिक बँक आणि नाणेनिधीची मंत्रिपातळीवरील व्यवस्था आहे. श्रीलंका, भूतान, बांगलादेश आणि भारत या चार देशांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व जेटली करीत आहेत. (वृत्तसंस्था)
‘गरीब देशांनाही जागतिक बँकेत स्थान द्या’
By admin | Updated: October 11, 2015 23:28 IST