इस्तंबूल : नववर्षाच्या रात्री इस्तंबूल नाईट क्लबमध्ये घडवून आणण्यात आलेल्या रक्तपाताची जबाबदारी इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. दरम्यान, पोलिसांनी ८ संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहे.नाईट क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार करून दोन भारतीयांसह ३९ जणांचे प्राण घेणारा हल्लेखोर फरार असून, तुर्की पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नववर्ष सुरू होऊन केवळ ७५ मिनिटे उलटली असताना हा हल्ला करण्यात आला होता. मृतांपैकी बहुतांश परदेशी नागरिक आहेत. इस्लामिक स्टेट आणि कुर्दिश दहशतवाद्यांच्या हिंसाचारामुळे २०१६ हे वर्ष तुर्कीसाठी रक्तरंजित ठरले होते. दुर्दैवाने २०१७ ची सुरुवातही रक्तरंजितच झाली. हल्लेखोर टॅक्सीने आला होता. प्रवेशद्वारावर तैनात पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकाला गोळ्या घालून तो नाईट क्लबमध्ये घुसला आणि तेथे नववर्षाच्या स्वागतात रमलेल्या लोकांवर त्याने गोळ्यांचा वर्षाव केला. त्यानंतर तो तेथून निसटला. हल्लेखोराला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे गृहमंत्री सुलेमान सोयलू यांनी सांगितले.
तुर्की नाईट क्लब हल्ल्यामागे इसीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2017 04:04 IST