ऑनलाइन लोकमत
केन्स (ऑस्ट्रेलिया), दि. १९ - ऑस्ट्रेलियातील केन्स येथे एकाच कुटुंबातील आठ लहान मुलांची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या हल्ल्यात एक महिलाही जखमी अवस्थेत आढळली असून ती या मुलांची आई असल्याचे समजते. सध्या त्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
केन्स परिसरात शुक्रवारी सकाळी एक महिला घराबाहेर रक्तबंबाळ अवस्थेत आढळल्याचा फोन स्थानिक पोलिसांना गेला होता. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घरात आठ लहान मुलांचे मृतदेह आढळले. या सर्वांची चाकूने वार करुन हत्या करण्यात आली होती. मृतांमध्ये १८ महिने ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश आहे. घरातील चित्र अत्यंत भीषणावह होते असे सर्वात पहिले घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस अधिका-याने स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले. या हत्याकांडामागे दहशतवादाचा काहीही संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. जखमी अवस्थेत आढळलेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु असून पोलिस तिच्याकडून नेमका घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ही हत्या कोणी केली, हत्येचे नेमके कारण हे अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.