हवाना : शीतयुद्धामुळे अनेक दशके चाललेले वैर बाजूला ठेवून अमेरिका आणि क्युबा संबंध सामान्य बनविण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरेल अशी उच्चस्तरीय चर्चा २२ जानेवारीपासून दोन दिवस करतील.अमेरिका आणि क्युबाचे वरिष्ठ अधिकारी स्थलांतर आणि एकमेकांच्या देशात जाऊन येण्याच्या मुद्यांवर दोन दिवस चर्चा करतील. १९६१ मध्ये या दोघांमधील संबंध संपुष्टात आल्यानंतर होणारी ही पहिलीच चर्चा असेल. क्युबाची राजधानी हवानात ही चर्चा होईल. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि क्युबाचे अध्यक्ष राऊल कॅस्ट्रो यांनी आम्ही संबंध स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशी घोषणा पाच आठवडे आधी केली होती. चर्चेचे प्रतिनिधित्व अमेरिकेतर्फे सहायक परराष्ट्रमंत्री रॉबर्टा जॅकब्सन आणि क्युबाच्या वतीने परराष्ट्र मंत्रालयाच्या संचालक जोसेफिना विडॉल करतील. चर्चेत सगळ्यात आधी स्थलांतर मुद्दा असेल. कारण दोन्ही देशांसाठी अनेक दशके हा अत्यंत वादाचा ठरला होता. अमेरिकेतील थिंक टँक अटलांटिक कौन्सिलमधील लॅटिन अमेरिकेचे विश्लेषक पीटर शेचर म्हणाले की, जॅकब्सन यांचा हा दौरा ऐतिहासिक ठरेल; परंतु त्यात काही चमत्कार घडण्याची अपेक्षा न ठेवलेली बरी. अमेरिकेबरोबर संबंध सुधारल्यास क्युबातील सामान्य लोकांच्या जगण्यात काही तरी सकारात्मक बदल घडतील. क्युबातील सुपर मार्केटची शोकेसेस रिकामी पडली आहेत, कारण सामान्य लोकांचे उत्पन्न दरमहा केवळ २० डॉलर आहे. संबंध सुधारण्यासाठी ओबामा यांनी घेतलेल्या पुढाकाराला बहुतांश अमेरिकनांनी पाठिंबा दिला आहे. दोन तृतीयांश अमेरिकन क्युबावरील निर्बंध मागे घ्यावेत अशा मतांचे आहेत, असे शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या सर्वेक्षणातून दिसते. (वृत्तसंस्था)च्हे दोन देश एकमेकांच्या जवळ येत असताना क्युबाचे सेवानिवृत्त नेते फिडेल कॅस्ट्रो (८८) मात्र शांत आहेत. या महत्त्वाच्या घडामोडींबद्दल त्यांनी जाहीरपणे कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही आणि त्याचमुळे त्यांच्या प्रकृतीबद्दल तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.
अर्धशतकानंतर गुरुवारपासून अमेरिका-क्युबात चर्चा
By admin | Updated: January 20, 2015 01:40 IST