ब्रिस्बेन : गेले दोन दिवस चाललेल्या जी-२० परिषदेची रविवारी अखेर झाली व जागतिक नेत्यांनी आपापल्या देशांचा आर्थिक विकास किमान २.१ टक्क्याने वाढविण्याचा निर्धार व्यक्त केल्यानंतर परिषदेचे सूप वाजले. विकसित देशांच्या अर्थव्यवस्था २.१ टक्क्याने वाढल्यास जागतिक अर्थव्यवस्थेत २ ट्रिलियन डॉलरची भर पडते. शिखर परिषदेत बहुतांश वेळ रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या युक्रेनवरील कारवाईवर टीका करण्यात खर्च झाला. दरम्यान, २०१६ मधील शिखर परिषदेचे यजमानपद चीनला मिळाले आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग करत आहेत,असे अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांनी पत्रकारांना सांगितले. पुतीन यांनी युक्रेन अस्थिर केला असल्याचा आरोप त्यांनी युरोपियन नेत्यांशी झालेल्या बैठकीत व्यक्त केला. शनिवारी टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पुतीन यांनी रशियावरील आर्थिक निर्बंध उठविण्याची मागणी केली होती. या निर्बंधांमुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोच; पण त्याचबरोबर जागतिक अर्थव्यवस्थेलाही नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागते, असे पुतीन यांनी म्हटले होते. जी-२० देशांच्या वित्तमंत्र्यांनी फेब्रुवारी महिन्यात जे निर्णय घेतले होते, तेच निर्णय आत्ता कायम ठेवण्यात आले. ब्रिस्बेन कृती आराखडा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कृती योजनेअंतर्गत जी-२० देशांचा एकत्र जीडीपी २ टक्क्याने वाढविला जाणार आहे. ही योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे, मंदीशी झगडणाऱ्या व आर्थिक विकास मंद असणाऱ्या अर्थव्यवस्थांना यातून गती मिळणार आहे. या सुधारणांमुळे लाखो नोकऱ्या तयार होतील, असे आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबॉट यांनी म्हटले असून, जागतिक पातळीवर रोजगारात महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले. बहुराष्ट्रीय कंपन्यांची करचुकवेगिरी रोखण्याचे उपाय योजण्याची घोषणा केली. (वृत्तसंस्था)
विकास दर २.१ टक्क्याने वाढीचा निर्धार
By admin | Updated: November 17, 2014 02:46 IST