लाहोर : लष्कर ए झांगवी या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा प्रमुख मलिक इशाक याची तीन वर्षांच्या तुरुंगवासानंतर मुक्तता झाली असून, पाक सरकारने त्याची शिक्षा वाढविण्यासंदर्भात काहीच हालचाली न केल्यामुळे तो आता मुक्त फिरणार हे स्पष्ट झाले आहे. मलिक इशाक याच्यावर २००९ साली श्रीलंकेच्या क्रिकेट खेळाडूंवर हल्ला करणे, तसेच अल्पसंख्य शियांवर हल्ले करणे, असे आरोप आहेत. २०१३ साली लष्कर ए झांगवीने क्वेट्टा येथे शिया नागरिकांवर केलेल्या हल्ल्यात २०० लोक ठार झाले होते. शांतता व सुरक्षा कायद्याखाली मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकी उर रेहमान लखवी याला तसेच इशाक याला पकडण्यात आले होते; पण लखविला जामीन मंजूर झाला असून, इशाकची सुटका झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने इशाकला जुलै २०११ मध्ये जामीन दिला होता; पण कायदा व सुरक्षा कायद्याखाली त्याला अटक करण्यात आली आहे. पंतप्रधान नवाज शरीफ एकीकडे दहशतवाद्यांचा बीमोड करण्याच्या वल्गना करत असून, दुसरीकडे दहशतवादी मोकळे सोडले जात आहेत. (वृत्तसंस्था)
कमांडर इशाकला सोडले
By admin | Published: December 24, 2014 3:25 AM