ऑनलाइन लोकमत
संयुक्त राष्ट्र, दि. २३ - मुंबई मास्टरमाइंड झकीऊर रहमान लख्वीच्या सुटकेसंदर्भात पाकिस्तानवर कारवाई करण्याच्या भारताच्या प्रस्तावात चीनने खोडा घातला आहे. भारताने लख्वी प्रकरणात पुरेशी माहिती दिली नसल्याचे सांगत चीनने या प्रस्तावात अडथळे आणण्याचे उद्योग सुरु केले आहेत.
एप्रिलमध्ये झकीऊर रहमान लख्वीची पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका झाली होती. २६/११ हल्ल्याच्या मास्टरमाईंडची अशी सुटका झाल्याने भारताने याचा तीव्र निषेध नोंदवला होता. तसेच या प्रकरणात पाकिस्तानवर कारवाई करावी असा प्रस्तावही भारताने संयुक्त राष्ट्राकडे दिला होता. लख्वीची सुटका करुन पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राच्या ठराव क्रमांक १२६७ चे उल्लंघन केल्याचे भारताने म्हटले होते. अमेरिकेसोबतच युरोपीय महासंघ, फ्रान्स, जर्मनी या देशांनीही लख्वीच्या सुटकेवर चिंता व्यक्त केली होती. भारताच्या मागणीनुसार संयुक्त राष्ट्राच्या निर्बंध समितीची बैठक झाली. बैठकीत पाकिस्तानकडून स्पष्टीकरण मागितले जाण्याची अपेक्षा होती. मात्र चीनने भारताने याप्रकरणात पुरेशी मागणी दिली नाही अशी भूमिका मांडली. त्यामुळे पाकची कोंडी करण्याच्या भारताच्या प्रयत्नात अडथळे निर्माण झाले. चीनने यापूर्वी हिजबूलच्या सईद सलाऊद्दीनवरील कारवाईविरोधातही तांत्रिक कारण पुढे केले होते.