खोट्या डॉलरचा मोह अंगलट : मृतांत २५ महिला, ४८ जण जखमीशांघाय : चीनची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शांघाय शहरात नववर्ष स्वागत सोहळ्यादरम्यान डॉलरच्या नोटांसारखे दिसणारे कूपन मिळविण्यासाठी लोकांची झुंबड उडून भीषण चेंगराचेंगरी झाली. यात ३६ जण चिरडून ठार झाले, तर ४८ जण जखमी झाले. मृतांत २५ महिलांचा समावेश आहे. हे कूपन जवळच्या एका इमारतीवरून फेकण्यात आले होते. लोक बुधवारी प्रसिद्ध बुंड भागात आयोजित मनोरंजक कार्यक्रमासाठी आले होते. तेव्हा मध्यरात्रीपूर्वी ही दुर्घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले. रात्री अकरा वाजून ३५ मिनिटांनी झालेली ही चेंगराचेंगरी शांघायमधील २०१० नंतरची सर्वात भीषण दुर्घटना आहे. २०१० मध्ये अपार्टमेंटला आग लागून ५८ जणांचा बळी गेला होता. एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून १०० अमेरिकी डॉलरच्या नोटांसारखे कूपन फेकण्यात आले होते. या कूपनला डॉलर समजून ते मिळविण्यासाठी लोक धावल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अरुंद पायऱ्यावरून लोकांचे खाली येणे सुरू असतानाच खाली असलेले लोक खोट्या नोटांसाठी मोठ्या संख्येने वर जाऊ लागले. तेव्हा गोंधळ उडून काहीजण कोसळले व त्यातून चेंगराचेंगरी झाली. हे कूपन अमेरिकी डॉलरच्या नोटांसारखे दिसत होते व त्याच्या मध्यावर एम-१८ असे छापलेले होते. बंड भागात एम-१८ नावाचा बार आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेपूर्वी एम-१८ बारचा मालक ते कूपन दाखवत असल्याची छायाचित्रे आपणास मिळाल्याचे काहींनी सोशल नेटवर्किंग साईटवर म्हटले आहे. (वृत्तसंस्था)राष्ट्राध्यक्षांकडून चौकशीचे आदेशच्मृत व्यक्ती १६ ते ३६ वर्षे वयोगटातील आहेत. जखमींमध्येही बहुतांश तरुणच असून १४ जखमींची प्रकृती गंभीर आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देत उत्सवादरम्यान अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी, असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
चीनमध्ये चेंगराचेंगरी; ३६ मृत्युमुखी
By admin | Updated: January 2, 2015 02:20 IST