सेऊल : भारताच्या ‘एनएसजी’ (आण्विकपुरवठादार समूह) सदस्यत्वासाठी चीनचा विरोध कायम आहे. गुरुवारी रात्री या समूहाच्या तीन तास चाललेल्या बैठकीनंतरही यावर तोडगा निघू शकला नाही. अर्थात, याबाबत आता शुक्रवारीच काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. ४८ सदस्य असलेल्या या समूहाच्या बैठकीत भारताच्या सदस्यत्वाचा मुद्दा नसल्याचे चीनचे सुरुवातीपासूनचे मत आहे. जपानने सकाळच्या सत्रात भारताचा हा मुद्दा मांडला होता. त्यानंतर हा विषय रात्रभोजनात चर्चिला जावा यावर सहमती झाली. दरम्यान, भारताच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आॅस्ट्रिया, न्यूझीलंड, तुर्की, आयर्लंड आणि ब्राझील यांनी भारताला विरोध दर्शविला. तसेच भारताने एनपीटीवर (अण्वस्त्र प्रसारबंदी करार) स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे या देशाचा एनएसजीत समावेश कसा होऊ शकतो? असा प्रश्नही उपस्थित केला. अर्थात, चीनही याच देशांच्या सोबत आहे. एकट्या भारताला सदस्यत्व देण्यास चीनचा विरोध असून, भारतासोबत पाकलाही सदस्यत्व दिले जावे, अशी चीनची भूमिका आहे. चीनने भारताची विनंती मान्य केल्यास अन्य राष्ट्रांचा विरोध मावळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. (वृत्तसंस्था)
‘एनएसजी’साठी चीनचा खोडा
By admin | Updated: June 24, 2016 05:00 IST