लंडन : ख्रिश्चन बांधवांचा सर्वात मोठा नाताळ सण अर्थात प्रभू येशूंचा जन्मोत्सव गुरुवारी जगभरात मोठ्या उत्साहाने व जल्लोषात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. व्हॅटिकन सिटीमधील प्रार्थना सभेद्वारे नाताळ उत्सवास प्रारंभ झाला. वर्षभर चाललेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नाताळच्या पूर्वसंध्येला पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकनमध्ये जमलेल्या मोठ्या जनसमुदायास संबोधित करताना ‘कारुण्य’ आणि ‘सहृदयता’ या भावनेचा अवलंब करण्याचे आवाहन केले. नाताळच्या पूर्वसंध्येला त्यांच्या (पोप यांच्या) संबोधनाचे प्रथमच थ्रीडीद्वारे थेट प्रक्षेपण झाले. पोप यांचा संक्षिप्त धर्मोपदेश ख्रिश्चन धर्माच्या संदर्भानुसार परिपूर्ण होता. सेंट पीटर्स बेसिलिका येथे प्रार्थनेसाठी जमलेल्या पाच हजार लोकांना उद्देशून पोप यांनी प्रश्न विचारला, ‘अवतीभोवतीच्या लोकांच्या अडचणी, समस्या सहृदयतेने स्वीकारण्याचे धाडस आमच्यात आहे का?’ ते म्हणाले, मग आम्ही औपचारिक तोडग्याला प्राधान्य द्यायला हवे का? हा मार्ग प्रभावी असू शकतो; मात्र तो धार्मिक सौहार्दतेहून भिन्न असेल. आज जगाला सहृदयतेची सर्वाधिक आवश्यकता आहे. जगभरातील रोमन कॅथॉलिक समुदायाच्या १.२ अब्ज नागरिकांच्या आध्यात्मिक प्रमुखांनी ख्रिश्चनांवर अत्याचार करण्याची प्रवृत्ती वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. पोप फ्रान्सिस यांनी इराकच्या कुर्द स्वायत्त क्षेत्रातून विस्थापित झालेल्यांना नाताळचा संदेश पाठवला. (वृत्तसंस्था)
नाताळ सण जगभरात उत्साहात
By admin | Updated: December 26, 2014 01:41 IST