वॉशिंग्टन : उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग-ऊन यांनी सुरू ठेवलेल्या शक्तिशाली बॉम्बच्या चाचण्या आणि अमेरिकेविरोधातील शाब्दिक हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनेही दम द्यायला सुरूवात केली आहे. पुन्हा एकदा अमेरिकेने आपली शक्तिशाली बॉम्बर विमाने किम जोंग-ऊनच्या भूमीवरून उडविली आहेत.उत्तर कोरियाच्या प्रक्षोभक क्षेपणास्त्र आणि अणु चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तुकडीशी ‘अनेक पर्यायांवर’ चर्चा केली. त्याचवेळी ही विमाने उत्तर कोरियावर घिरट्या घालत होती. उत्तर कोरियाने यावर्षी फेब्रुवारीपासून १५ चाचण्यांत २२ क्षेपणास्त्रे डागली. ही क्षेपणास्त्र चाचणी थांबवा, अन्यथा परिणाम वाईट होती, या अमेरिकेच्या धमकीला न बधता उत्तर कोरियाचे किम जोंग-ऊन यांनी चाचण्या सुरूच ठेवल्या आहेत. याच पार्श्वभूमिवर ट्रम्प यांनी मंगळवारी संरक्षण मंत्री जेम्स मॅटीस आणि अमेरिकेचे जॉर्इंट चीफ आॅफ स्टाफचे अध्यक्ष जनरल जोसेफ डनफोर्ड यांच्यासह वरिष्ठ सल्लागारांची व्हाइट हाऊसमध्ये भेट घेतली.येत्या काळात तणातणी आणखी वाढणार-उत्तर कोरियाकडून कोणत्याही स्वरुपात आक्रमण झाल्यास कशा प्रकारे प्रतिकार करता येईल आणि गरज भासल्यास उत्तर कोरियाला कसे रोखता येईल याच्या अनेक पर्यायांवर यावेळी चर्चा झाली, असे व्हाइट हाऊसने म्हटले आहे. एकूण अमेरिकेने उत्तर कोरियाच्या चाचण्यांची घेतलेली दखल आणि त्या देशावरून बॉम्बर विमानांची उड्डाणे यांमुळे तणाव अधिकच वाढण्याची शक्यता आहे.
बॉम्बर विमानांचे उत्तर कोरियावरून उड्डाण, अमेरिकेचेही शक्तिप्रदर्शन, तणाव वाढला; ट्रम्प यांची सुरक्षा सल्लागारांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 1:26 AM