पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. बॉम्बस्फोटात मेन गेट उडवण्यात आला. खैबर पख्तूनख्वा येथे ही घटना घडली. बजौर जिल्ह्यातील खार तहसीलमधील शाह नाराय भागात झालेल्या स्फोटामुळे एकच खळबळ उडाली.
पंतप्रधानांचे सल्लागार आणि नॅशनल असेंब्लीचे सदस्य मुबारक झेब खान यांच्या घरी बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात झेब खानच्या घराचा मुख्य दरवाजा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. घटनेच्या वेळी मुबारक झेब खान हे घरी उपस्थित नव्हते, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बाजौर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी मुबारक झेब खान यांच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ स्फोटकं ठेवली होती. अचानक झालेल्या जोरदार स्फोटामुळे मेन गेटचं मोठं नुकसान झालं.
हल्ल्यानंतर मुबारक झेब खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्या घराचा मेन गेट बॉम्बने उडवून देण्यात आला आहे. अल्लाहचे आभार की, कोणीही जखमी झालं नाही. हे भ्याड हल्ले करून मला घाबरवलं जाऊ शकत नाही" असं मुबारक झेब खान यांनी म्हटलं आहे. अद्याप कोणत्याही गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.