अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरितांविरुद्ध पुकारलेल्या युद्धाने आता रौद्र रूप धारण केले आहे. अमेरिकन गृह सुरक्षा विभागाने जाहीर केलेल्या सर्वात घातक गुन्हेगार यादीत तब्बल ८९ भारतीय वंशाच्या व्यक्तींचा समावेश असल्याचे समोर आले आहे. या कारवाईमुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायात मोठी खळबळ उडाली असून ट्रम्प यांच्या कठोर इमिग्रेशन धोरणाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा फटका मानला जात आहे.
काय आहे ही यादी?
डीएचएसने WOW.DHS.GOV नावाचे एक विशेष पोर्टल सुरू केले आहे. यावर सुमारे २५,००० 'क्रिमिनल इल्लीगल एलियन्स'चा अर्थात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अवैध स्थलांतरितांचा संपूर्ण तपशील देण्यात आला आहे. यात हत्या, लैंगिक अत्याचार आणि अमली पदार्थांची तस्करी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी असलेल्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या वेबसाईटवर गुन्हेगाराचे नाव, फोटो, त्याने केलेला गुन्हा आणि राष्ट्रीयता जाहीर करण्यात आली आहे.
अमनदीप आणि हरजिंदरसह ८९ भारतीयांचा समावेश
या यादीत भारतीय वंशाच्या ८९ लोकांची नावे असणे ही चिंतेची बाब ठरली आहे. यामध्ये अमनदीप मुल्तानी आणि हरजिंदर सिंह यांसारख्या नावांचा प्रामुख्याने उल्लेख आहे, ज्यांच्यावर अमली पदार्थांच्या तस्करीचे गंभीर आरोप आहेत. "अमेरिकन नागरिकांना अशा लोकांचा त्रास सहन करावा लागू नये, ज्यांना येथे राहण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही," असे ठाम प्रतिपादन ट्रम्प प्रशासनाने केले आहे.
ही तर फक्त सुरुवात-DHSचा इशारा
ही यादी म्हणजे केवळ एक स्नॅपशॉट असून, पकडल्या गेलेल्या गुन्हेगारांची संख्या यापेक्षा कितीतरी मोठी असू शकते, असे गृह सुरक्षा विभागाने स्पष्ट केले आहे. "जोपर्यंत अशा प्रत्येक व्यक्तीला देशाबाहेर हाकलले जात नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही," असा सज्जड दमही विभागाने दिला आहे.
ट्रम्प यांच्या या निर्णयावरून अमेरिकेत राजकीय वातावरण तापले आहे. डेमोक्रॅट खासदारांनी या कारवाईला विरोध करत डीएचएसचा निधी रोखला आहे. तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याची मागणी केली जात आहे. एजंटनी मास्क काढावेत आणि बॉडी कॅमेरे वापरावेत, अशी मागणी विरोधक करत आहेत. मात्र, ट्रम्प सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असून झुकण्यास तयार नाही.
भारतीय समुदायावर परिणाम?
या यादीमुळे अमेरिकेतील भारतीय समुदायाच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जरी या यादीतील लोक गंभीर गुन्हेगार असले, तरी यामुळे सर्वसामान्य स्थलांतरितांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ट्रम्प यांचे हे पाऊल मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या दृष्टीने भविष्यात वादाचे केंद्र ठरू शकते.
Web Summary : Trump administration's anti-immigration drive lists 89 Indian-origin individuals as 'most wanted' criminals in the US, causing concern within the Indian community. They are accused of serious crimes like drug trafficking.
Web Summary : ट्रंप प्रशासन के अवैध आप्रवासन विरोधी अभियान में 89 भारतीय मूल के लोग अमेरिका में 'मोस्ट वांटेड' अपराधी घोषित, भारतीय समुदाय में चिंता. इन पर ड्रग तस्करी जैसे गंभीर आरोप हैं।