बीजिंग : चीनमध्ये भ्रष्टाचाराच्या संशयावरून सहायक परराष्ट्र मंत्र्यास बडतर्फ करण्यात आले आहे. झांग कुनशेंग हे आता सहायक परराष्ट्रमंत्री नाहीत. शिस्तभंग केल्याच्या संशयावरून त्यांची चौकशी सुरू आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने आज सांगितले. झांग चीनच्या चार सहायक परराष्ट्र मंत्र्यांपैकी सर्वात वरिष्ठ मंत्री होते आणि त्यांच्याकडे शिष्टाचार विभाग होता, असे वृत्त चिनी माध्यमांनी दिले आहे.परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते असलेल्या क्वीन गांग यांच्याकडे आता शिष्टाचार विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. सहायक परराष्ट्रमंत्री लियू जियानचाओ हे प्रभारी प्रमुख प्रवक्ते असतील. लियू यांनी यापूर्वीही ही जबाबदारी सांभाळली आहे. दोन वर्षांपूर्वी पदभार स्वीकारल्यापासून चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आक्रमक मोहीम उघडली आहे. (वृत्तसंस्था)भ्रष्टाचार ही समस्या एवढी भयंकर आहे की, त्यामुळे कम्युनिस्ट पार्टीची सत्ता कायम राखण्याची क्षमता खिळखिळी होत असल्याचा इशारा देत जिनपिंग यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध बिगुल फुंकला. माजी गृहमंत्र्यांसह अनेक जण चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत; मात्र परराष्ट्र मंत्रालयातील एखाद्या यात अडकण्याची ही पहिलीच वेळ आहे. परराष्ट्र मंत्रालय हे विदेशी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे काम करते. इतर मंत्रालयांच्या तुलनेत या मंत्रालयाला खूपच कमी अधिकार असतात.
चीनमध्ये सहायक परराष्ट्रमंत्री बडतर्फ
By admin | Updated: January 3, 2015 02:42 IST