ऑनलाइन लोकमतमॉस्को, दि. 15- सायबेरिया प्रांतातील एका 4 वर्षांच्या मुलीला आजीची औषधं आणण्यासाठी चक्क 8 किलोमीटर बर्फाळ जंगलातून पायपीट करावी लागली आहे. या प्रकारानंतर ही चिमुकली सायबेरियात चर्चेत आली आहे. सागलाना सालचक असं मुलीचं नाव असून, ती फक्त 4 वर्षांची आहे. तिच्या आईला एका फौजदारी खटल्यात अटक करण्यात आली आहे. त्यामुळे ती तिच्या आजीसोबतच मंगलियन सीमेवरील टायगा जंगलातील एका शेतात राहते. या दोघी राहत असलेल्या शेतापासून गाव 19 किलोमीटर दूर आहे. तर आठ किलोमीटर अंतरावर त्यांचे शेजारी राहतात. गेल्या महिन्यापासून 60 वर्षांच्या तिच्या आजीची अचानक हालचाल बंद झाली आहे. त्यानंतर स्वतःच्या आजीशी चर्चा करून ती मदतीसाठी बाहेर पडली, असं एका स्थानिक वृत्तपत्रानं सांगितलं आहे. चार वर्षांची ही चिमुकली पहाटेच्या काळोखात घराबाहेर पडली होती. तसेच तिनं सोबत फक्त स्वतःजवळ काही माचीसचे बॉक्स बाळगले होते. त्यावेळी तापमान खूप कमी होते. अशाच परिस्थितीत त्या चिमुकलीनं बर्फाच्छादित नदीच्या किना-यावरून 8 किलोमीटरचं अंतर पार केलं. सुदैवानं ती त्या बर्फात फसली नाही. विशेष म्हणजे लांडग्यासारख्या जंगली श्वापदांपासूनही तिनं स्वतःचं संरक्षण करत हा पल्ला गाठला आहे. सागलाना आता शेजा-यांच्या घराची आठवण काढत आहे. एवढं लांबच अंतर अनेक कठीण प्रसंगांना तोंड देत पार करून अखेर तिने तिच्या आजारी आजीसाठी औषधं आणली आहेत. सोशल मीडियावरून तिच्या या धाडसाचं फारच कौतुक होतंय. त्यानंतर तिला अनेकांनी मदतीचे हातही दिले आहेत. तुवा चौकशी समिती या सर्व प्रकरणाची चौकशी करत आहे. मात्र प्रकरणामुळे सगळीकडूनच आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
आजारी आजीसाठी चिमुकलीची 8 किमी बर्फातून पायपीट
By admin | Published: March 15, 2017 5:51 PM