Donald Trump's One Big Beautiful Bill Passed : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे 'वन बिग ब्युटीफुल बिल' गुरुवारी रात्री उशिरा प्रतिनिधी सभागृहातही (हाऊस ऑफ रिप्रेजेंटेटिव्हज) २१८-२१४ मतांनी मंजूर झाले आहे. हे ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मोठे यश मानले जाते आहे. सिनेट आणि प्रतिनिधी सभागृहातून मंजूर झाल्यानंतर, हे बिल अथवा विधेयक आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, या विधेयकावरील मतदानादरम्यान, दोन रिपब्लिकन खासदारांनी पक्षाची बाजू सोडून डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने मतदान केले.
विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर, व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेव्हिट यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता आपल्या मोठ्या कर सवलत आणि खर्च कपात विधेयकावर स्वाक्षरी करण्याचा विचार करत आहेत.
८०० हून अधिक पानांचे हे विधेयक मंजूर करण्यासाठी ट्रम्प यांना मोठे परिश्रम घ्यावे लागले आहेत. या विधेयकासाठी जीओपी नेत्यांना रात्रभर काम करावे लागले. तसेच, ट्रम्प यांनी पुरेशी मते मिळविण्यासाठी होल्डआउटवर वैयक्तिकरित्या दबावही टाकला होता.विधेयकात नेमके काय...?या विधेयकात, कर कपात, लष्करी बजेट, संरक्षण आणि ऊर्जा उत्पादनासाठी वाढलेला खर्च, तसेच आरोग्य आणि पोषण कार्यक्रमांवरील खर्चात कपात, अशा प्रमुख तरतुदींचा समावेश आहे. याशिवाय, हे विधेयक बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मोठ्या प्रमाणात हद्दपारीसाठी वाढत्या खर्चाशी देखील संबंधित आहे. तर, इतर विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की, या खर्चाचा देशाच्या आरोग्य आणि शिक्षणासारख्या क्षेत्रांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळेच, उद्योगपती इलॉन मस्कसह एक मोठा वर्ग या विधेयकाच्या विरोधात आहे आणि यावर टीका करत आहे.