ऑनलाइन लोकमत
काबूल, दि. १ - अफगाण सैन्य आणि तालिबानी दहशतवादी यांच्यातील संघर्ष एका विवाह सोहळ्यासाठी जीवघेणा ठरला आहे. या संघर्षादरम्यान एक रॉकेट विवाह सोहळा सुरु असलेल्या घरावर जाऊन पडला आणि यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला.
अफगाणिस्तानच्या दक्षिण हेल्मंड प्रांतातील एका घरामध्ये बुधवारी रात्री विवाह सोहळा होता. विवाह सोहळ्यानिमित्त घरात अनेक मंडळी उपस्थित होती. घरात लग्नाची तयारी जोरात सुरु असतानाच अचानक एक रॉकेट येऊन घरावर पडले आणि अवघ्या काही क्षणात संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले. हा रॉकेट अफगाण सैन्य आणि तालिबानी दहशतवादी यांच्यातील संघर्षासाठी वापरण्यात आला होता. या दुर्दैवी घटनेत २६ जणांचा मृत्यू झाला तर सुमारे ६० जण जखमी झाले. 'घरातील आनंदाचे वातावरण क्षणार्धात आक्रोश आणि किंकाळ्यांमध्ये बदलले. घरातील नऊ लहान मुलांचा अद्याप काहीच थांगपत्ता नसून काही मृतदेहांची ओळख पटवणेही अशक्य झाले अशी प्रतिक्रिया मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांनी दिली. रॉकेट अफगाण सैन्याने सोडलेला की तालिबानी दहशतवाद्यांनी हे अद्याप समजू शकलेले नाही.