हिंगोली : येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयासमोर मराठवाडा सर्व श्रमिक संघटना, कामगारांच्या वतीने मंगळवारपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.आंदोलनकर्त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, तालुका बीजगुणन केंद्र फळरोपवाटिका केंद्रावरील रोजंदारी कामगारांचे वेतन १९ महिन्यांपासून थकले आहे. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. कर्जबाजारीही झालो आहोत. कामगारांनी वेळोवेळी वरिष्ठांच्या गाठीभेटी घेतल्या ,त्यांच्यासमोर समस्या मांडल्या, मात्र काही उपयोग झाला नाही. फरक मिळावा व तो वेतनात समाविष्ट करावा, वसमत, बासंबा, आखाडा बाळापूर या वनक्षेत्रावरील कामगारांचे प्रश्न, किमान वेतन कायद्याखाली असलेल्या तरतुदीप्रमाणे हजेरी कार्ड, ओळखपत्र व वेतन स्लिप कामगारांना द्यावी अशा विविध मागण्या केल्या आहेत. ५ मार्चपासून धरणे सुरू केले असून जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा आंदोलकांनी निर्धार केला आहे. आंदोलनात नागनाथ स्वामी, सुशीलाबाई जबडे, रमाबाई गटकवाढ, पदमिनाबाई रणबावळे, तुळशीराम लक्ष्मण भाग्यवान, शेषराव गडबडे, सय्यद मेहबूब सय्यद नासिर यांच्यासह कामगार सहभागी झाले आहेत.
कामगारांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:56 IST