स्थानिक गुन्हे शाखेला तर जिल्ह्यात कुठे काय चाललय याची काहीच खबर नसते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कान पिळले की, हा विभाग जागा होतो. तोपर्यंत कुंभकर्णी झोपेत असतो. ही कुंभकर्णी झोपच ठाणेदारांनाही फायदेशीर ठरत आहे. मात्र, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्याकडे प्रभार आल्यानंतर ही सर्व मंडळी अचानक जागी झाली होती. पोलीस दल कधी नव्हे ते पहिल्यांदाच ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले होते. शीघ्र प्रतिसाद नसेल तर काळे यांनीही नोटीस देण्याचा धडाका लावला होता. त्यामुळे रात्रीच्या गस्तीला झोपा काढणारे अचानकच रस्त्यावर दिसू लागले होते. त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांच्या माल वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. इतर काही बाबींमध्ये थेट पोलीस अधीक्षकच लक्ष ठेवून असल्याने अधिकाऱ्यांना लपवा - छपवीची संधीच उरली नव्हती. त्यातच वरूनच थेट कारवाईचे आदेश आल्याने ठाणेदारांनीही कारवाईसाठी पुढाकार घेत कर्मचाऱ्यांना कामाला लावले होते. त्यामुळे रोज नवनव्या कारवाया होऊ लागल्या होत्या. या काळात वसमतच्या आंतरराज्यीय टोळीला पडकल्याच्या आनंदात स्थानिक गुन्हे शाखेने मात्र आपली सक्रियता कमी केली. नंतर महानिरीक्षकांच्या मोहिमेतही जुजबी कारवाया केल्या. अजूनही हीच अवस्था आहे. मात्र, ठाणेदारांच्या सक्रियतेमागे स्थागुशाशी असलेली स्पर्धाच कारणीभूत असल्याचे आता समोर येत आहे. आता सगळीकडूनच अभय असल्याने औंढ्यात तर खेडोपाडी मटका पोहोचला. पोलीस अधूनमधून नवा चेहरा पकडून ठाण्यात आणतात. कुरुंदा, हट्टा व आखाडा बाळापूर हद्दीत तर नवे व जुने असे कोणी कुणाच्याच हाती लागत नाहीत, याचे आश्चर्य आहे. कनेरगाव व गोरेगावकडील मंडळी तर हिंगोली जिल्ह्याच्या बाहेर असल्यासारखीच बिनधास्त आहेत. प्रशिक्षणे, कार्यशाळांतून उसंत मिळाल्यास पोलीस याकडे लक्ष देतील, अशी सामान्यांची अपेक्षा आहे.
प्रभारीच्या काळात जोमात, आता का कोमात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:27 IST