कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने शासनाने अनलाॅक केले असले तरी, पॅसेंजर रेल्वे काही सुरू केली नाही. त्यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील जुनुना, कंजारा, काटारोड, पैनगंगा, पिंपळ चौरे आदी रेल्वे स्टेशन बंदच आहेत. ‘डेमो’ रेल्वे गाडी या ठिकाणी थांबेल असे वाटले होते. परंतु, ‘डेमो’ गाडी थांबत नाही. सध्या सणावाराचे दिवस असून बाजारपेठेत जावेत लागते, असे प्रवाशांनी सांगितले.
बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वे...
पूर्णा ते अकोला, परळी ते अकोला या दोन पॅसेंजर रेल्वे गाड्या दीड वर्षापासून बंदच आहेत. अजून तरी रेल्वे विभागााने याची दखल घेतलेली नाही.
एक्स्प्रेस सुरू, मग पॅसेंजर बंद का?
शासनाने एक्स्प्रेस रेल्वे सुरू केल्या आहेत. मात्र पॅसेंजर रेल्वे अजूनही सुरू केल्या नाहीत. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अवैध वाहतुकीने प्रवास करावा, तर ते भाडे परवडत नाही. रेल्वे विभागाने पॅसेंजर रेल्वे सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.
कोरोनाआधी हिंगोली स्थानकावरून तीन पॅसेंजर रेल्वे सुरू होत्या. एक वर्ष तर एकही पॅसेंजर रेल्वे सुरू नव्हती. प्रवासी व व्यापाऱ्यांनी मागणी केल्यानंतर डेमो गाडी सुरू केली आहे. परंतु, या गाडीला एक्स्प्रेसचे तिकीट लावले जात आहे. दुसरीकडे ही गाडी छोट्या स्थानकावर थांबत नाही, अशी प्रवाशांची तक्रार आहे.