यंदा कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाला अनेक निर्बंधांचा सामना करावा लागत आहे. गर्दी टाळायची असल्याने यंदा अनेकांनी घरगुती गणेश स्थापनेकडे कल वळविल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यामुळे अनेक ठिकाणी लहान-मोठ्या गणेशमूर्ती विक्रीची दुकाने थाटल्याचे दिसून येत होते. त्यात सार्वजनिकपेक्षा घरगुती मूर्ती बसविण्यासाठीच लहान मुलांसह अनेकजण मूर्ती खरेदीसाठी आल्याचे पहायला मिळत होते. विविध प्रकारच्या आकर्षक सजावट व रंगरंगोटी असलेल्या मूर्तींना मागणी दिसून येत होती.
ग्रामीण भागातूनही गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येथे आल्याचे पहायला मिळाले. दरवर्षी बँड, ढाेल व ताशांच्या गजरात गणरायांचे आगमन होते. यंदा कोरोनाच्या निर्बंधामुळे असे काही नव्हते. मात्र शिस्तीत व शांततेत सगळीकडे गणेश स्थापना झाली.
विघ्नहर्ताची पालखी मिरवणूक
श्री विघ्नहर्ता चिंतामणी मंदिर गड्डेपीर गल्ली यांच्याही उत्सवास मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत वाहनातून पालखी मिरवणूक काढून प्रारंभ झाला. शासकीय विश्रामगृहावरून खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, संस्थानचे सचिव दिलीप बांगर, राम कदम, अंकुशराव आहेर, उद्धवराव गायकवाड, भानुदास जाधव, परमेश्वर मांडगे, अतुल जैस्वाल, डॉ. शिंदे, श्रीशैल्य स्वामी आदींची उपस्थिती होती.