हिंगोली : यावर्षी जिल्ह्यात पाण्याची मुबलकता जास्त असल्याने मागील दोन-तीन आठवड्यांपासून पालेभाज्यांची आवक वाढली आहे. संक्रांतीला पालेभाज्यांचे भाव उतरल्याने ग्राहकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
यावर्षी जिल्ह्यात सुरुवातीपासून पाण्याची मुबलकता आहे. मागील दोन-तीन आठवड्यांपासून पालेभाज्यांची आवकही वाढली आहे. मकरसंक्रांतीला पालेभाज्यांचे भाव वाढतील असे वाटले होते; परंतु, आवक जास्त झाल्याने मकरसंक्रांतीला भाज्यांचे भाव उतरले. मात्र वांगे २५ रुपये किलो, हिरवी मिरची ३० रुपये किलो तर लिंबू ३० रुपये किलो दराने विक्री झाले. संक्रांतीला वांगे, हरवी मिरची, लिंबाची आवक एकदम कमी झाली आहे. शहरातील मंडईत भेंडी १० रुपये किलो, कार्ले १० रुपये किलो, टोमॅटो १० रुपये, चवळी १० रुपये किलो, गवार १० रुपये किलो, पान कोबी १० रुपये किलो, फूल कोबी १० रुपये किलो, सीमला मिरची २० रुपये किलो, आलू २० रुपये किलो, मुळा ५ रुपयास एक, मेथी ५ रुपयास जुडी, कोथिंबीर ५ रुपयास जुडी या प्रकारे विक्री झाल्याचे हरुण चौधरी यांनी सांगितले.
मकरसंक्रांतीला तिळगुळात स्थिरता
मकरसंक्रांतीला तीळ, गूळ आणि साखरेचा भाव वाढेल असे वाटले होते; परंतु, तीळ, गूळ आणि साखरेचे भाव स्थिर असल्याचे पहायला मिळाले. बाजारात तीळ १३० रुपये किलो, गूळ ३५ रुपये किलो, साखर ३६ रुपये किलो, सोयाबीन तेल १२५ रुपये किलो, सूर्यफूल तेल १३० रुपये किलो, तर शेंगदाणा तेल ९० रुपये किलो दराने विक्री झाल्याचे विजयकुमार गुंडेवार यांनी सांगितले.