लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकशाहीमध्ये माहितीचा अधिकार हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याबद्दल समज-गैरसमज असले तरीही सर्वसामान्यांना त्यामुळे मोठा दिलासा व न्याय मिळत आहे. माहिती अधिकार व्यापक जनहितासाठी वापरला पाहिजे, असे मत माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांनी व्यक्त केले.हिंगोली जिल्ह्यातील माहिती अधिकारातील ४०० अपीलांचा निपटारा करण्यासाठी औरंगाबादचे माहिती आयुक्त धारूरकर मंगळवारी आले होते. त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, विविध विभागातील अपीलांचा निपटारा केला जाणार आहे. समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी व्हावी यासाठी आंदोलने केली. माहिती आयुक्तांच्या नियुक्त्या झाल्या. सध्या राज्यात माहितीच्या अधिकारातील अपीलांचा निपटारा करण्यासाठी आता माहिती आयोग खंडपीठ आपल्या दारी हा उपक्रम सुरू झाल्याचे सांगितले. या माध्यमातून संबंधित विभाग आणि अपीलार्थी यांची सुनावणी खंडपीठासमोर होत असून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत आहे. अनेक प्रकरणे ही व्यापक जनहित असलेली असतात. अशा प्रकरणांवर माहिती आयोग गांभीर्याने विचार करीत आहे. त्यावर तत्काळ निर्णय होत असल्याने लोकही समाधानी आहेत. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचीही त्यांनी उत्तरे दिली. तर माहिती अधिकाराकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याची गरज आहे. आयोगाच्या सुनावणीदरम्यान अपीलार्थीचे मागणी कोणत्या स्वरूपाची आहे. ती व्यापक जनहिताशी संबंधित आहे काय यासह सर्व बाजूंनी अभ्यास केला जातो आणि त्यानंतरच निर्णय होतो, असे ते म्हणाले.
माहिती अधिकार जनहितासाठी वापरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 01:11 IST