औंढा नागनाथ : तालुक्यामध्ये जवळा बाजार व साळणा सर्कलमध्ये महसूल विभागाने वाळूमाफियांनी जमा केलेल्या वाळूसाठ्यांचे पंचनामे करून जप्त केले होते. याकडे महसूल विभागाने दुर्लक्ष केल्याने वाळू माफियांकडून हे वाळूसाठे उचलण्याचे काम जलदगतीने होत असून, यामध्ये हजारो ब्रास वाळू नेल्या जात आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील पोटा, तपोवन, अंजनवाडी, अनखळी, चिमेगाव, भगवा आदी ठिकाणच्या रेती घाटांवरून नियमबाह्य वाळूचा उपसा करून रॉयल्टी न भरताच पूर्णा नदीकाठांच्या शेतामध्ये अवैध वाळू जमवून हजारो ब्रास रेतीसाठा करण्यात आला होता. परंतु तहसीलदार श्याम मदनूरकर यांनी दीड महिन्यांपूर्वी अवैध वाळूसाठे जमा करणाऱ्यांच्या विरोधात मोहीम हाती घेतली. त्यांनी त्या-त्या सज्जातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना ज्या ठिकाणी वाळूसाठे आहेत, अशा ठिकाणांचा पंचनामा करून सदर वाळू जमा केलेल्या पावत्यांच्या हिशेबाची मागणी केली होती. त्यानंतर हे वाळूसाठे जप्त करण्यात आले; परंतु संबंधित वाळूमाफियांनी महसूल विभागाला कुठल्याही प्रकारचे वाळू साठ्याबाबत विवरण न देताच हे साठे सध्या गायब करण्याचे काम सुरू केले आहे. टिप्पर, ट्रॅक्टर अशा मिळेल त्या वाहनांमधून हे साठे हलविले जात आहेत. सध्या महसूल विभागाचे कर्मचारी निवडणुकीच्या कामामध्ये गुंतले असल्याने यामध्ये वाळूमाफियांचे चांगभले होत आहे. यामुळे शासनाचा हजारो रुपयांचा महसूल बुडवला जात असून जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
हजारो ब्रास वाळू गायब
By admin | Updated: September 27, 2014 00:55 IST