कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आला होता. सर्व व्यवहार ठप्प पडले होते. याचा फटका प्रवासी वाहनांना बसला तसा रेल्वे विभागालाही बसला आहे. रेल्वे बंद झाल्याने प्रवाशांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागले. अव्वाच्या सव्वा प्रवास भाडे देत खासगी वाहनाने प्रवास करावा लागला. कोरोनाचे संकट टळत असताना शासनाने काही नियम व अटी लागू करत प्रवासी वाहने सुरू केली. रेल्वे विभागाने स्पेशल गाड्या सुरू केल्या. कोरोनापूर्वी हिंगोली रेल्वे स्थानकावरून १६ प्रवासी रेल्वे धावत होत्या. यात १३ एक्स्प्रेस, तर ३ पॅसेंजर रेल्वेगाड्यांचा समावेश होता. आता कोरोनानंतर ६ रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. या सर्व रेल्वे विशेष रेल्वे म्हणून धावत आहेत. यात केवळ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनाच प्रवास करू दिला जात आहे. यातही प्रवास भाडे जास्त आकारले जात असल्याने प्रवाशांच्या खिशाला फटका बसत आहे.
छोट्या आणि मोठ्या अंतरासाठीच्या भाड्यात वाढ
छोट्या अंतरासाठी
हिंगोली येथून पूर्णा, नांदेड, परभणी, अकोला आदी मार्गावर रेल्वे धावतात. मात्र, कोरोनामुळे या मार्गावरील रेल्वे गाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता केवळ ६ रेल्वे धावत आहेत. यातही प्रवास दर वाढल्याने हिंगोलीपासून जवळचे अंतर असलेल्या अकोलासाठी १०० रुपये, पूर्णेसाठी १०० रुपये घेतले जात आहेत. कोरोनापूर्वी अकोला येथे जाण्यासाठी एक्स्प्रेस रेल्वेचे तिकीट दर ६० रुपये होते, तर पूर्णा येथे जाण्यासाठी ४५ रुपये तिकीट दर होता.
मोठ्या अंतरासाठी
हिंगोली रेल्वे स्थानकावरून नागपूर, दिल्ली, जयपूर, श्रीगंगानगर, तिरूपती, हैदराबाद, मुंबई, कोल्हापूर आदी लांब पल्ल्याच्या रेल्वे धावतात. सध्या ६ रेल्वे धावत आहेत. लांब पल्ल्याच्या रेल्वेला प्रवासी संख्या जास्त मिळते. मात्र, सध्या जयपूर, सिकंदराबाद, श्रीगंगानगर, तिरूपती, हैदराबाद, नरखेड, काचिगुडा येथे जाण्यासाठी रेल्वे धावत आहेत. मोठ्या अंतरासाठीच्या रेल्वे दरातही मोठी वाढ झाली आहे.
कोरोनापूर्वी
१६ रेल्वे धावायच्या
आता धावतात
६ रेल्वे धावतात
सध्या हिंगोली रेल्वे स्थानकावरून स्पेशल रेल्वे धावत आहेत. यातील बहुतांश रेल्वे छोट्या रेल्वे स्थानकावर थांबत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय प्रवासभाड्यात वाढ झाल्याने प्रवाशांच्या खिशाला फटका बसत आहे.
-संदीप हराळ
हिंगोली येथून केवळ सहाच रेल्वे धावत आहेत. यातही आरक्षण करूनच प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा आरक्षित जागा मिळत नाही. परिणामी जादा पैसे देऊनही इतर प्रवासी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.
-दीपक कावरखे