हिंगोली: अनलॉक होताच एसटी महामंडळाच्या ‘शिवशाही’ बसेसही सुसाट धावत आहेत. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात भर पडत आहे. सणासुदीचे दिवस असताना ग्रामीण भागातील बसेस सुरू करायला पाहिजे, परंतु शासनाचा आदेश नसल्यामुळे बसेस सुरू करता येत नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हिंगोली आगारात आजमितीस ७ ‘शिवशाही’ बसेस आहेत. या ७ पैकी २ बसेस हिंगोली ते औरंगाबाद अशा पाठविल्या जातात. पहिली दुपारी १२ वाजता आणि दुसरी दुपारी २ वाजता बस सोडली जाते. कोरोना महामारीच्या काळात ‘शिवशाही’ बसेस बंद होत्या. त्यामुळे एसटी महामंडळाला आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. आजमितीस कोरोना महामारी थोडीबहुत संपली आहे. त्यामुळे प्रवाशांकडून प्रतिसादही मिळत आहे. ग्रामीण भागातील बसेस सुरू करण्यास परवानगी मिळाल्यास महामंडळाच्या उत्पन्नात अधिक भर पडू शकते. ग्रामीण भागाबाबत प्रवासी रोज विचारणा करत आहेत, परंतु शासनाचा अजून कोणताही संदेश आलेला नाही.
या मार्गावर सुरू आहेत ‘शिवशाही’
हिंगोली ते औरंगाबाद
जिल्ह्यातील एकूण आगार ३
सुरू असलेल्या शिवशाही २
एकूण शिवशाही ७
बसेसचे दररोज सॅनिटायझेशन...
हिंगोली आगारातून दररोज बसेसचे सॅनिटायझेशन केले जाते. कोणतीच बस सॅनिटायझेशनशिवाय डेपोतून बाहेर पाठविली जात नाही. प्रारंभी बसेस पाण्याने स्वच्छ केल्या जातात. प्रवास लांबचा असल्यामुळे चालक-वाहकांनाही मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या जातात. प्रवाशांनाही मास्कबाबत विचारणा केली जाते.
शासनाच्या आदेशाप्रमाणे शिवशाही बसेस सुरू केल्या आहेत. सध्या तरी या बसेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भाग सुरू केल्यास एसटी महामंडळाच्या उत्पन्नात भर पडू शकते.
- संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख, हिंगोली.
११३७ (डमी)