शहरात शीतपेयांची दुकाने थाटली
हिंगोली : मागील चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. दिवसभर उन्हाचे चटके बसत आहे. यामुळे शहरात जागोजागी उसाचा रस, ज्युस, कोल्ड्रिंक्स आदी शीतपेयाची दुकाने थाटल्या जात आहे. शहरातील या दुकानांमध्ये नागरिक उन्हापासून बचाव व्हावा यासाठी शीतपेयाचे सेवन करीत असल्याचे दिसून येत आहे.
गिरगाव ते वसमत रस्त्याची दुरवस्था
वसमत : येथून गिरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना आपले वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच अनेकदा खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक दुचाकीस्वरांचा अपघातही घडत आहे. यासाठी हा रस्ता दुरुस्त करावी, अशी मागणी होत आहे.
मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला
हिंगोली : शहरातील रिसाला बाजार, गणेशवाडी चौक, जय भारत शाळा, आदर्श कॉलेज रस्ता आदी ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. सदरिल मोकाट कुत्रे रस्त्यावरून ये - जा करणाऱ्या वाहनधारकांच्या पाठीमागे लागून चावा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे अनेक नागरिकांत भीती पसरली आहे. यासाठी या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
येहळेगाव सो.-निशाणा रस्ता उखडला
औंढा ना. : तालुक्यातील येहळेगाव सो.-निशाणी रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे व गिट्टी उघडी पडली आहे. यामुळे या रस्त्यावर धुळीचे वातावरण राहत आहे. याचबरोबर गिट्टीवर अनेकदा छोटे-मोठे वाहने घसरून अपघात घडत असल्याचे प्रकारही या ठिकाणी घडत आहे. यासाठी हा रस्ता दुरुस्त व्हावा, अशी मागणी होत आहे.
भाजीमंडई परिसरात वाहतुकीस अडथळा
हिंगोली : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या भाजीमंडई परिसरात लागणाऱ्या फळ हातगाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अनेक हातगाडे रस्त्यामध्ये येत असल्याने पायदळ नागरिकांसह वाहनधारकांना रस्त्यावरून ये-जा करताना अडथळा निर्माण होत आहे.
वीज पुरवठा वारंवार खंडित
हिंगोली : शहरातील जिजामाता नगर परिसरातील वीज पुरवठा सकाळी व सायंकाळच्या सुमारास वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. सकाळी व सायंकाळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसह घरातील गृहिणींना स्वयंपाक करताना याचा मोठा त्रास होत आहे. यासाठी वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत व्हावा अशी मागणी होत आहे.
वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती
रामेश्वर तांडा : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा परिसरात मोठे वन विभागाचे क्षेत्र आहे. सध्या उन्हाची तीव्रता ही वाढत चालली असल्यामुळे या भागातील वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. अनेक पाणवट्टे कोरडे होत असल्याने वन्य प्राणी इतरत्र ठिकाणी पाण्यासाठी भटकत आहेत.
हातपंप दुरुस्त करण्याची मागणी
कळमनुरी : सध्या उन्हाळ्याची सुरुवात झाली असून अनेक गावातील ओढे, तलाव कोरडे पडत आहेत. यासाठी अनेक गावात नादुरुस्त असणारे हातपंप दुरुस्त करावी अशी मागणी गावांतून होत आहे. हातपंप दुरुस्त केल्याने नागरिकांना भटकंती न करता पाणी उपलब्ध होईल, अशी चर्चा गावकऱ्यांत होत आहे.