जवळा बाजार परिसरातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असून याठिकाणी १७ सदस्यसंख्या आहे. त्यापैकी एक जागा शिवसेनेची बिनविरोध निवडून आली आहे. त्यामुळे १६ जागांसाठी ४३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दोन्ही पॅनेलसह अपक्षही मैदानात उतरले आहेत. काही अपक्षांनीसुद्धा चांगलाच जोर लावल्यामुळे निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. विशेषत: शिवसेनेच्या वतीने ११, भाजपच्या वतीने ३, तर राष्ट्रवादीच्या वतीने ३ असे ग्रामविकास पॅनेल तर माजी समाजकल्याण सभापती मुनीर पटेल यांच्या एकता पॅनेलच्यावतीने १६ उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. त्यामुळे सध्यातरी या निवडणुकीमध्ये मतदारांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याठिकाणची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे. आ. राजू नवघरे, माजी आ. जयप्रकाश मुंदडा व भाजपचे काही कार्यकर्ते यांनी येथील निवडणुकीमध्ये लक्ष देऊन आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावत आहेत तसेच एकता पॅनेलच्यावतीनेही पॅनेल प्रमुख मुनीर पटेल स्वतः प्रचारात उतरून उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही अपक्ष उमेदवार प्रचारात जोर लावत असल्यामुळे याठिकाणीची निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार असून या निवडणुकीत काेण बाजी मारणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.
जवळा बाजारमध्ये आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:18 IST