जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या गोरेगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले आहे. प्रचाराचा जोर सुरू असताना जि. प. सदस्य संजय कावरखे यांच्या पेट्रोलपंपावर दि. १० जानेवारीच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास दोन गटांत शिवीगाळ व धक्काबुक्कीचा प्रकार घडला. सदर प्रकरणी संजय कावरखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेश भय्या पाटील गोरेगावकर, अजित विश्वनाथ कावरखे, विक्रम गजानन कावरखे व इतराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमच्याविरुध्द निवडणूक का लढवता, असे म्हणून सदर आरोपी शिवीगाळ करीत, धक्काबुकी करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे सदर फिर्यादीत म्हटले आहे.
दुसऱ्या गटाकडून दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपावर आलेल्या कार्यकर्त्यास संजय कावरखे यांनी विरोधी गटाचा प्रचार का करतो, असे म्हणत धमक्या दिल्या असल्याच्या कारणावरून सदर वाद उद्भवल्याचे सांगितले जात आहे. याबाबत परस्पर विरोधी तक्रार दिल्याचे म्हटले जात असले तरी अद्याप गुन्हा नोंद झाला नसल्याची माहिती आहे.