बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी
डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे परिसरातील वाटेगाव, लोहगाव, सावळी, भोसी, करंजाळा, वडचुना, दूरचना, सिद्धेश्वर आदी गावांतील बससेवा दहा महिन्यांपासून बंद आहेत. यामुळे प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. यामुळे जास्तीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. एस. टी. महामंडळाच्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन ग्रामीण भागातील बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
अनुदान जमा करण्याची मागणी
डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे परिसरातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे अनुदान अजूनही खात्यावर पडले नाही. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. अनेकांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले नाही त्यांना लवकरात लवकर अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
ग्रामपंचायत प्रचार सुरू
डिग्रस कऱ्हाळे : ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पाच प्रभागांतून १३ उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. २९ उमेदवार निवडणुकीत उभे आहेत. सध्या गाठीभेटीवर प्रचार सुरू आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे.