नाल्यांवर फवारणीची मागणी
हिंगोली: शहरातील कापडगल्ली, मंगळवारा, तोफखाना आदी भागातील नाल्या अनेक दिवसांपासून साफ करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या भागात डासांचे प्रमाण वाढले आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने नाल्यांवर औषध फवारणी करुन नाल्या साफ करणे गरजेचे आहे.
पर्यायी रस्ता बनला डोकेदुखी
हिंगोली: शहरात उड्डाण पुलाचे काम मागील अनेक महिन्यांपासून सुरु आहे. त्यामुळे या ठिकाणावरुन वाहनचालकांना पर्यायी रस्ता देण्यात आला आहे. परंतु, हा रस्ता अत्यंत खराब झाला असून खड्डेमय बनला आहे. यामुळे वाहनचालकांचे अतोनात नुकसान होत आहे. संबंधित विभागाने हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.
गतीरोधकाची मागणी
हिंगोली: शहरातील विश्रामगृह ते रेल्वे उड्डाणपूलपर्यत कुठेही गतीरोधक नाही. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून गतीरोधक टाकणे गरजेचे आहे. गतीरोधक नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. काही वाहनचालक बेफामपणे वाहने चालवित आहेत. संबंधित विभागाने याची दखल घेऊन गतीरोधक बसवावे, अशी मागणी होत आहे.
गतीरोधक धोकादायक
हिंगोली: पेन्शनपुरा जवळ असलेले गतीरोधक अत्यंत धोकादायक बनले असून वाहनांचे नेहमीच येथे अपघात होत आहेत. या ठिकाणावरुन वाहने वेगाने चालविली जात आहेत. हा रस्ता औंढा नागनाथकडे जाणारा रस्ता असल्याने वाहनांची संख्या अधिक आहे. तेव्हा या ठिकाणचे गतीरोधक नव्याने तयार करुन अपघात टाळावे, अशी मागणी होत आहे.
विजेचा लपंडाव सुरुच
कळमनुरी: यावर्षी तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले राहिले आहे. त्यामुळे विहीर व तलावांना भरपूर प्रमाणात पाणी आहे. तालुक्यात पिकेही चांगली आहेत. परंतु, मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव हा नित्याचाच झाला आहे. विहिरींना पाणी असून सुद्धा ते पिकांना देता येत नाही. महावितरण कंपनीने याची दखल घेऊन तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.