वसमत : शहरातील दारू दुकानांवरून पार्सल दारू दुचाकीवरून पूर्णा (ता. परभणी) कडे जाणाऱ्या दुचाकीस्वारास वसमत पोलिसांनी पकडले. दारू व दुचाकी असा ५१ हजार ४५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
वसमत शहरातील झेंडा चौक परिसरातून दिवसभर अनेक दुचाकीस्वार दारूची खोकी घेऊन गावोगावी जात असतात. भर बाजारपेठेतून हा प्रकार चालत असला, तरी पोलिसांची भीती वाटत नाही. पार्सल दारू करणारे पार्सलस्वारच परवानाधारकांकडे तैनात आहेत. उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने हा प्रकार वाढत चालला आहे. दारू दुकानांसमोरील रस्त्यावर दारू विकणाऱ्यांची गर्दी होत आहे. ‘लोकमत’ ने पाठपुरावा सुरू ठेवल्यामुळे एलसीबीने दोन कारवाया केल्या आहेत. रविवारी शहर पोलिसांनी एका दुचाकीस्वारास पकडले. त्याच्याकडून ५१ हजार ४५० रुपयांचा ऐवज जप्त केला. पोलीस हवालदार प्रेमदास चव्हाण यांच्या तक्रारीवरुन संभाजी मोरे (रा. आहेरवाडी, ता. पूर्णा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वसमत शहरातील झेंडा चौकात पोलिसांचा फिक्स पाँईट असतो. तसेच या ठिकाणी सीसीटीव्ही लावलेले आहेत. तरीही पार्सल दारू दिवसभर दुचाकीवरून जात असते.
सीसीटीव्ही समोरुन व पोलीस हजर असताना ही दारू वाहतूक करण्याची हिंमत कशी होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दारू विक्रेत्यांच्या आखाड्यावरील बैठका व मैफिली यास कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.